भजन
भाललोचना ! रे गड्या ! भेटि देइ आज ।
उध्दरिली महानंदा कृपेने सहज ॥धृ॥
उपमन्यु बाळासाठी केला दुग्धसिंधू ।
हलाहल प्राशूनिया राखियली लाज ॥१॥
ऎसी वेदग्रंथ कीर्ति वर्णिती अनंत ।
ऋषिमहंतांचे तुवा पुरविलेसि काज ॥२॥
घेउनि त्रिशूल डमरू, नंदिस्वार होत ।
अर्धांगि सती पार्वती, गणपती सिध्दिराज ॥३॥
भूत डाकिणी पिशाच, घेउनी सहीत ।
तुकड्या म्हणे कैलासी, उभारिला ध्वज ॥४॥
